Breaking News

सुखकर्ता, दुःखहर्ता संस्थान गणपती, राजाबाजार, औरंगाबाद

श्री संस्थान गणपती हे औरंगाबाद शहराचे नगरदैवत असून श्री खडकेश्वर मंदिर आणि श्री सुपारी मारूती एवढेच प्राचीन आणि ऐतिहासिक आहे. या मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती पूर्वाभिमूख आहे. ही मुर्ती २ बाय २ आकाराची असून डाव्या सोंडेची आहे. श्री संस्थान गणपतीची मूर्ती बसलेल्या अवस्थेत असून अत्यंत सुंदर अशा काळ्या दगडातील स्वयंभु आणि जागृत मुर्ती आहे.  हिचा महिमा फार महान आहे. अनेक भक्तांच्या मनोकामना आजपर्यंत या गणेशाने पूर्ण केलेल्या आहेत व आजही स्फूर्ती घेवुन आपले मनोगत अनेकजण साधत आहे. आपल्या महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या मूर्तीच्या जोडीचीच ही विनायकाची मूर्ती आहे. ही प्राचीन स्वयंभू मूर्ती पहाताच मनाला आनंद देणारी व आत्म्याला सुखावणारी आहे. या देखण्या मूर्तीला बघितले की, श्रध्देला आपोआप पाझर फुटतो व भाविक मनुष्य अत्यंत सहजगत्या मूर्तीकडे आकर्षिला जातो.

औरंगाबाद शहराची निर्मिती अत्यंत पुरातन आहे. हे अस्तीत्वात असलेल्या जुन्या अवशेषामुळे सिध्द होते. जुन्या आवशेषाबरोबरच अनेक देवस्थानेही पुरातनत्वाची साक्ष आजही देत आहेत. औरंगाबादची जुनी देवालये बालाजी मंदिर, राजाबाजार, पोवाबालाजी, रोकडीया हनुमान, जाफर गेट, स्मशान मारोती, राधामोहन खोकडपुरा, बालाजी मंदिर बायजीपुरा, ढोरपुरा, सुपारी हनुमान, तसेच संस्थान गणपती ह्या सर्व देवस्थानांची नोंद जुने इंडोमेंट रेकॉर्डमध्ये आजही आहे. ह्या देवालयास निजाम सालारजंग यांनी पूजा व दिवाबत्तीसाठी अनुदाने दिल्याची नोंद असून स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत सवलत प्रत्येक देवालयास होती. तसेच मोंढ्यावर वरील मंदीरासाठी विक्रीस आलेल्या धान्यातून मुठ्ठी तसेच कापसातून थोडा कापूस देण्याचा अलिखीत दंडक होता. ह्या वरून धार्मिक भावना जनमाणसात मुळापर्यंत रूजलेली लक्षात येते. मध्यंतरी धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या घोषणामुळे धार्मिक भावनेला तडा बसून आहोटी लागली व त्यामुळे हिंदू धर्मावरच त्याचा जास्त परिणाम झाला व इतर धर्मकडवे होत चालले. त्यामुळे काही धर्म रक्षकांनी हिंदुमध्ये धार्मिक भावना निर्माण करून मंदिरे बांधण्यात आली व हिंदुनी इतर जाती बरोबर सहिष्णुत्वाचे धोरण स्वीकारून हिंदुमध्ये हिंदु धर्माची ज्योत जागृत केली. आजही प्रत्येक कार्याची सुरूवात श्री गणपती देवतेचे पूजन करून होते.

औरंगाबादचे संस्थान गणपती हे जुने देवस्थान, पुरातन काळात शहराचे नागरीक ह्या गणपतीचे, बालाजीचे दर्शन घेतल्यावरच आपल्या दैनंदिन कार्याला सुरूवात करीत असत. हे मंदिर चांगल्या अवस्थेत होते. पण रस्ता रूंद झाल्यामुळे व रजाकारांच्या काळात या मंदिराची पडझड होऊन येथून मंदिराचे अस्तित्वच नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण गणेश भक्तांनी याचे सदैव रक्षण केले. आजही दररोज चतुर्थीला शेकडो हजारो भाविक पूजा करतात. आज या मंदिराचा जिर्णोध्दार होत आहे. हे औरंगाबादकरांना निश्चितच भूषणावह आहे.

visit sansthan ganpati, rajabazar, aurangabad official website

No comments