Breaking News

संडे स्पेशल डीश : व्हेज मंच्युरीयन बनवा घरच्या घरी


आजच्या आमच्या संडे स्पेशल सदरात आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक झक्कास चायनीज रेसीपी जी सर्वांना खुप आवडते ती म्हणजे व्हेज मंच्युरीयन. व्हेज मंच्युरीयन बनवण्याची एक खास कृती आपल्यासाठी चला तर मग व्हा तयार व बनवा स्वत:च्या हाताने चायनीज स्टाईल मंच्युरीयन. 

यासाठी लागणारे साहित्य नोट करुन घ्या :
  1. एक मोठी सिमला मिरची व एक मध्यम कांदा चौकोनी तुकडे करून
  2. चार-पाच लाल सुक्या मिरच्या, तीन चार हिरव्या मिरच्या
  3. प्रत्येकी अर्धी वाटी मटार व मका दाणे
  4. अर्धी वाटी चिरलेली कांद्याची पात व पातीचे कांदे
  5. एक मोठा चमचा व्हिनीगर, दोन मोठे चमचे सोया सॉस, चार मोठे चमचे तेल व तळण्याकरीता तेल
  6. चार मोठे चमचे कॉर्न स्टार्च , तीन कप पाणी व चवीनुसार मीठ
  7. दहा-बारा लसूण पाकळ्या व बोटभर आले बारीक चिरून
  8. मशरूम्स, बेबी कॉर्न, वॉटर चेसनटस, बांबूच्या पातळ पट्ट्या
  9. एक मध्यम गाजर किसून, किसलेला कोबी दोन वाट्या, किसलेला फ्लॉवर एक वाटी
व्हेज मंच्युरीयन करण्याची कृती पुढीलप्रमाणे :

प्रथम फ्लॉवर, कोबी, गाजर किसून घ्यावे. मटार व मक्याचे दाणे मिनिटभर मायक्रोव्हेव मध्ये ठेवून वाफवून घ्यावेत किंवा उकळते पाणी त्यावर ओतून संपूर्ण निथळून घ्यावेत. कांद्याची पात बारीक चिरून घ्यावी. एका भांड्यात हे सगळे घालून हाताने कुस्करून घ्यावे. मग चवीपुरते मीठ घालू पुन्हा कुस्करावे. आता त्यात दोन चमचे लाल तिखट व दोन चमचे मैदा, एक चमचा तांदुळाचे पीठ घालून एकत्र करावे. नंतर त्यात दोन मोठे चमचे कॉर्न स्टार्च घालावे, जेणेकरून मिश्रण बांधले जाईल. मग छोटे छोटे गोळे वळून मध्यम आचेवर लालसर रंगावर तळून घ्यावेत. 

भोपळी मिरची व कांद्याचे चौकोनी तुकडे करावेत. हिरव्या मिरचीचे पोट फोडून घ्यावे. बेबी कॉर्न, वॉटर चेसनटस, बांबू पट्ट्या, मशरूम्स यातले जे उपलब्ध असेल व आवडत असेल ते प्रत्येकी अर्धी वाटी चकत्या करून घ्यावे. पातीचा कांदा मुळे काढून संपूर्णच ठेवावा. लसूण व आले अगदी बारीक चिरावे. किसून अथवा मिक्सरला वाटून घेऊ नये. एका पसरट कढईत चार चमचे तेल घालून मोठ्या आचेवर ठेवावी. तेल तापले की त्यात आले लसूण टाकून मिनिटभर परतावे. त्यावर हिरव्या मिरच्या व लाल मिरच्या टाकून पुन्हा मिनिटभर परतावे. घेतलेल्या सगळ्या भाज्या आता त्यावर टाकाव्यात व पाच ते सात मिनिटे परतत राहावे. आच कमी करू नये. भाज्या अर्धवट शिजतील की मग व्हिनीगर व सोया सॉस घालावे. चवीनुसार मीठ व दोन भांडी पाणी घालून आच मध्यम करावी. झाकण ठेवू नये. साधारण पाच-सहा मिनिटात उकळी फुटली की तळून ठेवलेले गोळे घालावेत. लगेचच अर्धी वाटी गार पाण्यात कॉर्न स्टार्च विरघळवून घेऊन या मिश्रणाला लावावे व हालवत राहावे. कॉर्न स्टार्चमुळे मिश्रण थोडेसे घट्ट होऊ लागले की नीट ढवळून तीनचार मिनिटात बंद करावे. साध्या गरम भाताबरोबर, चायनीज फ्राईड राईसबरोबर किंवा नुसतेच आवडेल तसे परंतु गरम गरम खावे. 

आपल्याला ही रेसीपी कशी वाटली हे आम्हाला जरुर कळवा व आपल्याकडील रेसीपी आम्हाला ctindia2009@gmail.com वर पाठवा आम्ही ती आपल्या नावानीशी प्रसिध्द करु....


=================================
All above content are copyright of respected owner we share just link and brief information.
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/Aurangabad.City.Of.Gates 
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments