काय असते तबगीगी इज्तेमा ? नौशाद उस्मान, औरंगाबाद


नुकताच औरंगाबादला लाखो लोकांच्या उपस्थितीत "तबलिगी इज्तेमा" सुरु झाला आहे. त्यानिमीत्ताने हा काय प्रकार असतो याचे कुतुहल मराठी माणसांत जागं झालं आहे. म्हणून आपण तबलिगी जमातचा आधी परिचय करून घेऊ. पाठीवर भलेमोठे बॅग, पिशव्या, गाठोडं वगैरे घेतलेले कुर्ता, पायजामा घातलेले लांब लांब दाढी, टोपीवाल्यांचा जत्था रस्त्याने जात असतांना तुम्ही अनेक वेळा बघितला असेलच. हे जत्थे म्हणजे काही मोजक्या यशस्वी मुस्लिम चळवळीपैकी एक ती चळवळ आहे - तबलिगी जमात. सन 1927 मध्ये हरयाणाच्या मेवात शहरात मौलाना इलियास कांधीलवी यांनी याची स्थापना केली. विशेष म्हणजे ही संघटना किंवा सांप्रदाय नसून फक्त एक चळवळ आहे. याचं केंद्र दिल्ली येथे निजामुद्दीन परिसरात मुख्यालयात आहे. मौलाना साद हे सध्या याचे सुप्रीमो आहेत. 

भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ व इतर दक्षिण आशियाई देश यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहेत. भारतीय उपमहाद्विपात इतरांच्या अंधानुकरणातून काही कर्मकांडे मुस्लिम समाजात घुसल्याने अनेक रूढी परंपरांच्या आहारी इथला समाज गेला होता. त्यात सुधारणा करून खरा इस्लाम लोकांना समाजाऊन सांगणे, नमाज पढण्याची पद्धत शिकवणे, तसेच दारूबंदी, व्यसनमूक्ती, व्यभिचारमूक्ती व इतर वाईट सवयींच्या निर्मुलनाकरिताही यात प्रशिक्षण दिले जाते. यांचे कुठेही स्थानिक कार्यालय नसते. गावा-गावात जत्थे (जमात) बनवून मशिदीत काही दिवस मुक्काम करतात, तिथल्या स्थानिक लोकांचं प्रबोधन करतात आणि तिथल्या काही स्थानिक लोकांना सामील करून तो जत्था पुढे जातो. तीन दिवस, दहा दिवस, 40 दिवस किंवा 4 महिने असे वेगवेगळे कालावधीचे प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार या जत्थ्यात योगदान देत असतो. ज्याचा कालावधी पूर्ण झाला तो घरी निघून जात असतो आणि नवीन जुळलेल्या "साथी"चा कालावधी सुरू होत असतो. अशाप्रकारे हे जत्थे एकाचवेळी जगभरात भ्रमण करत असतात. 

लोकं बदलत असतात पण जत्था (जमात) तीच राहते. काही जमात एकमेकांत merge केले जातात तर काही जमाती मोठ्या झाल्या की त्याचे दोन तीन गटांत विभागणी करून वेगवेगळ्या दिशेने पाठविले जातात. याचे नियोजन करण्यासाठी कुठेतरी वर्षातून, महिन्यातून "जोड" हा कार्यक्रम ठेवला जातो. जत्थाचा एक स्थानिक "अमीर (प्रमुख)" निवडला जातो. जागोजागी रोज मशिदीत दिवसातून एकदा "मशवरा (सल्लामसल्लत)" होत असते. मुस्लिम वस्तीत प्रत्येक नमाज नंतर गस्त घातली जाते. घरोघरी जाऊन प्रबोधन केले जाते, नमाजसाठी आमंत्रित केलं जाते तसेच जमातसोबत दुसर्या गावी निघण्याकरिता आग्रह केला जातो. अशाप्रकारे ही जमात म्हणजे धार्मिक प्रौढ शिक्षणासाठी एक चालती बोलती शाळा (मदरसा) आहे. आता मौलाना कलीम सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली काही ठिकाणी या चळवळीच्या कक्षा रूंदावल्या आहेत. आता ते एक गस्त मुस्लिम वस्तीत तर एक गस्त मुस्लिमेतर वस्तीत घालत असतात. 

या जमाअतचे लोकं दर्गाहवर जाणे, तिथं नवस वगैरे फेडणे वगैरे गोष्टींना मानत नाही. ही एक गैरराजकीय चळवळ आहे. इतर लौकिक बाबतीत कोणतीही चर्चा किंवा वक्तव्य करत नाही. फक्त धार्मिक आणि त्यातल्या त्यात नमाज पढण्यावरच ही जमात जास्त भर देते. यांच्या इज्तेमा (जाहिर अधिवेशन) मध्ये वक्त्याचे नाव दिलेले नसते तर फक्त "बयाण (भाषण)" आणि त्याची वेळ दिलेली असते. लग्नकार्यात उधळपट्टी नको, आई वडिलांची सेवा, पती पत्नीचे अधिकार, लेकरांचे संगोपन, हलाल कमाईचे महत्व, प्रबोधनाची गरज, त्यासाठी त्यागाचे महत्व, नमाजचे महत्व यासारखे त्यांच्या भाषणाचे विषय असतात.

मात्र अमीरचा आदेश, वेळेचं नियोजन वगैरे यांची शिस्त वाखाणण्याजोगी आहे. इज्तेमाच्या शेवटी स्वतःसाठी, समाजासाठी, देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी एक एक - दोन दोन तास दुवा मागितली जाते. सर्वसाधारणपणे देवबंद, नदवा, अक्कलकुवा वगैरे मदरस्यातील उलेमा(विचारवंत), मौलवी हे यांचे मार्गदर्शक असतात. जमातमध्ये सोबत प्रवासात असतांना हे एकमेकांशी ज्याप्रमाणे सौजन्याने वागतात, ते कौतुकास्पद आहे. 

जमातबांधनीसाठी सोशल मीडियाचा वापर, व्हिडिओ, फोटोजचा वापर वगैरे आधुनिक बदलही आता यात होत आहेत, ही सकारात्मक परिवर्तनाची नांदी आहे. औरंगाबाद येथे नुकतंच संपन्न होत असलेला इज्तेमामध्ये शहरात ट्रॅफिकचं उत्तम असं नियोजन करणारे स्वयंसेवक, जागोजागी मोफत बसेसची आणि नाश्ता पाण्याच्या व्यवस्थेमुळे शहरात जरासुद्धा ताण बसला नाही, यावरून त्यांच्या कार्यकुशलतेची पावती मिळते. या इज्तेमाच्या निमित्ताने मुस्लिम समाजाची एक सकारात्मक प्रतिमा उजळून येत आहे, जो सर्वांसाठी आदर्श ठरू शकतो.

No comments